तज्ज्ञांच्या मते, योग्य पदार्थांसोबत सेवन केल्यास ते अन्न आरोग्यदायी ठरते. यालाच फूड कॉम्बिनेशन असे म्हटले जाते. चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. एका अंड्यामधून ७७ कॅलरीज, ६ ग्रॅम प्रथिने आणि ५ ग्रॅम फॅट्स मिळतात. या सर्व पोषकतत्वांमुळेच अंड्याला पौष्टिक आहार असे म्हटले जाते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते. अंडी हे प्रोटीन आणि जीवनसत्त्वांचे समृद्ध स्रोत असलेले सुपरफूड असले तरी चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
अंडी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असली, तरी काही पदार्थांसोबत त्यांचे सेवन टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे बद्धकोष्ठता, मळमळ, थकवा, पोटदुखी आणि इतर पचनविकार उद्भवू शकतात.
दूध आणि अंडी
अंडी दूध किंवा पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नयेत, असे मानले जाते. या संयोजनामुळे पचनावर ताण येऊ शकतो आणि काही लोकांमध्ये अॅसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
चहा आणि अंडी
अनेक जण चहा आणि अंडी एकत्र खातात. मात्र या कॉम्बिनेशनमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
सोया मिल्क आणि अंडी
सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्यास शरीरातील प्रथिनांचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे प्रोटीनसाठी अंडी खाणाऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणूनच सोया मिल्क आणि अंडी एकत्र घेणे टाळावे. जिममध्ये जाणारे बरेच लोक अंड्यासोबत सोया मिल्कचे सेवन करतात. सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील प्रथिनांच्या शोषण प्रक्रियेत अडथळा येतो.
साखर आणि अंडी
अंड्याच्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर करणे किंवा अंडी खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते या संयोजनामुळे शरीरात हानिकारक घटक तयार होण्याची शक्यता असते. खरं तर, जेव्हा या दोन गोष्टी एकत्र शिजवल्या जातात तेव्हा त्यामधून बाहेर पडणारे अमीनो अॅसिड शरीरासाठी विषारी बनतात, ज्यामुळे रक्त गोठण्याची समस्या वाढू शकते.
फळे आणि अंडी
केळी, खरबूज, कलिंगड यांसारखी फळे अंडी खाल्ल्यानंतर लगेच खाऊ नयेत. यामुळे पोट फुगणे, अपचन आणि जडपणा जाणवू शकतो.
मांसाहार आणि अंडी
मांस, मासे यांसारख्या जड मांसाहारी पदार्थांसोबत अंडी खाल्ल्यास सुस्ती येणे किंवा पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. विशेषतः मासे आणि उकडलेले अंडे एकत्र खाल्ल्यास काही लोकांमध्ये त्वचेची अॅलर्जी दिसून येते. अनेक ठिकाणी अंडी आणि बेकन यांचे मिश्रण म्हणजे भाजलेले मांस खाल्ले जाते. त्यात भरपूर प्रथिने आणि चरबी असल्याने, या मिश्रणामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अंडी आहारात जरूर समाविष्ट करा, पण योग्य फूड कॉम्बिनेशनची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

