(मुंबई)
शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील नवी मुंबई येथे भारतातील पहिली आणि जगातील सर्वात मोठी ‘एज्युसिटी’ (Edu City) उभारण्यात येणार असून, एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार आहेत. या प्रकल्पामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भासणार नसल्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
पनवेलजवळ 100 हेक्टरवर उभारला जाणार महत्त्वाकांक्षी प्रकल्प
सिडकोच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) संकल्पनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, एकात्मिक आरोग्य सेवा, अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक जागतिक विद्यापीठे
या एज्युसिटीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे कार्यरत असतील. हा देशातील पहिलाच असा प्रकल्प ठरणार आहे. 14 जून 2025 रोजी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने जगातील नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. त्यामध्ये पुढील संस्थांचा समावेश आहे:
- युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन (स्कॉटलंड)
- युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (युनायटेड किंगडम)
- युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया)
- इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
- इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली)
याशिवाय आणखी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे या प्रकल्पात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 मार्च 2025 रोजी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमाँट आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. या बैठकीत एज्युसिटी प्रकल्पासाठी कनेक्टिकट राज्याच्या सहकार्याबाबत चर्चा झाली होती.
विमानतळ, मेट्रो आणि अटल सेतूमुळे वाढणार कनेक्टिव्हिटी
प्रस्तावित एज्युसिटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारली जाणार असून, मेट्रो, अटल सेतू, आंतरराष्ट्रीय बंदर आणि आधुनिक रस्ते जाळ्यामुळे देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईला जागतिक शिक्षण केंद्र म्हणून नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
AI, सायबर सुरक्षा आणि STEMसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांवर भर
या एज्युसिटीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. विशेषतः STEM, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सुरक्षा, प्रगत अभियांत्रिकी, फॅशन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
परदेशात जाण्याचा खर्च वाचणार
दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र, शिक्षण आणि राहणीमानाचा प्रचंड खर्च अनेक विद्यार्थ्यांना परवडत नाही. नवी मुंबईतील या एज्युसिटीमुळे भारतातच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. ही एज्युसिटी केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

