भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर तसेच मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फरस आणि मॅंगनीज यांसारखी महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय जीवनसत्त्वे A, B, C आणि E, अँटिऑक्सिडंट्स व फेनोलिक संयुगे असल्यामुळे भोपळ्याच्या बियांना पोषणतज्ञ मोठ्या प्रमाणात प्राधान्य देतात.
आतापर्यंत भोपळ्याच्या बिया महिलांसाठी फायदेशीर असल्याचं जास्त सांगितलं जात होतं. मात्र, प्रसिद्ध पोषणतज्ञ दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओत भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठीही तितक्याच उपयुक्त असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुरुषांच्या संपूर्ण आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया कशा फायदेशीर आहेत, ते जाणून घेऊया.
प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत
भोपळ्याच्या बिया झिंकचा उत्कृष्ट स्रोत आहेत. झिंक हे पुरुषांसाठी अत्यावश्यक खनिज असून ते टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे हार्मोनल बॅलन्स सुधारतो आणि उर्जेची पातळी टिकून राहते. तसंच भोपळ्याच्या बिया शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते. प्रजनन समस्या असलेल्या पुरुषांनी रोज भोपळ्याच्या बिया आहारात समाविष्ट कराव्यात, असा सल्ला पोषणतज्ञ देतात.
हृदयाचे आरोग्य मजबूत करते
भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. वाढलेलं खराब कोलेस्ट्रॉल हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतं. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या पुरुषांसाठी भोपळ्याच्या बिया विशेष फायदेशीर ठरू शकतात.
प्रोस्टेट आरोग्यासाठी उपयुक्त
पुरुषांसाठी प्रोस्टेट आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेली नैसर्गिक संयुगे प्रोस्टेटच्या आरोग्यास संरक्षण देतात. नियमित सेवन केल्यास प्रोस्टेटशी संबंधित समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. झिंक, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबी हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.
इतर आरोग्य फायदे
भोपळ्याच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेह असलेल्या पुरुषांसाठीही या बिया फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि जास्त खाण्यापासून प्रतिबंध होतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी भोपळ्याच्या बिया चांगला पर्याय ठरतात. गर्भवती आणि स्तनपान महिलांनी भोपळ्याच्या बिया कमी प्रमाणात सेवन कराव्यात.
दररोज किती भोपळ्याच्या बिया खाव्यात?
दररोज 1 ते 2 चमचे भाजलेल्या किंवा मीठ न लावलेल्या भोपळ्याच्या बिया खाणे योग्य मानले जाते. त्या सॅलड, स्मूदी, दहीमध्ये घालू शकता किंवा थेट स्नॅक म्हणूनही खाऊ शकता. जास्त मीठ असलेल्या बिया टाळाव्यात. दररोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास त्यातील निरोगी चरबी आणि फायबर पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यासही मदत करतात. भोपळ्यामध्ये भरपूर फायबर असते. जे पचनासाठी खूप चांगले असते. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर अतिसाराची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त, हे ओटीपोटात दुखणे, पेटके आणि सूज वाढवू शकते.
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ सामान्य वाचनासाठी आहे. याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नये. कोणताही आहार बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे)

