दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अवेळी जेवण, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असतो. सुरुवातीला हे बदल किरकोळ वाटतात, मात्र कालांतराने ते खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत ठरतात, जे संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकते.
शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलचे संतुलन आवश्यक असते. पण जेव्हा रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते, तेव्हा हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.
कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय?
कोलेस्ट्रॉल म्हटलं की अनेकांना थेट हार्ट अटॅक आठवतो. मात्र American Heart Associationनुसार, कोलेस्ट्रॉल हा लिव्हरमध्ये तयार होणारा मेणासारखा पदार्थ असून तो पेशींची निर्मिती, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन D तयार करण्यासाठी अत्यावश्यक असतो. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा रक्तातील कोलेस्ट्रॉल मर्यादेपेक्षा जास्त वाढतो आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचतो. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) असे म्हणतात.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार कोणते?
शरीरात प्रामुख्याने दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात:
LDL (Low Density Lipoprotein)
याला ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ म्हटलं जातं. LDL रक्तवाहिन्यांमध्ये साचून अडथळा निर्माण करतो. त्यामुळे हृदयाला आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
HDL (High Density Lipoprotein)
हे ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ मानले जाते. Harvard Healthनुसार, HDL अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रक्तातून गोळा करून पुन्हा लिव्हरकडे पाठवते, जिथून ते शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे निरोगी हृदयासाठी HDL जास्त आणि LDL कमी असणे आवश्यक असते. याशिवाय ट्रायग्लिसराईड्स हा देखील रक्तातील चरबीचा प्रकार असून त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यावर दिसणारी लक्षणे
कोलेस्ट्रॉल वाढत असताना सुरुवातीला फारशी लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. मात्र पातळी जास्त वाढल्यानंतर खालील संकेत दिसू शकतात:
- मळमळणे किंवा भोवळ येणे
- चालताना लगेच दम लागणे
- छातीत हलक्या वेदना जाणवणे
- हातपाय सुन्न पडणे
- त्वचेखाली, कोपर, गुडघे किंवा टाचांवर पिवळसर डाग
- मेंदूपर्यंत रक्तप्रवाह कमी झाल्यास बोलण्यात किंवा दृष्टीत अडथळा
30% मृत्यू खराब कोलेस्ट्रॉलमुळे
World Health Organizationच्या अहवालानुसार, जगभरातील हृदयविकाराशी संबंधित सुमारे 30 टक्के मृत्यू हे वाढलेल्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे होतात. भारतात बैठी जीवनशैली आणि तळलेले पदार्थ जास्त खाण्यामुळे तरुणांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढत आहे.
खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रमुख कारणे
- तळलेले, तेलकट आणि जंक फूड
- जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ
- शारीरिक हालचालींचा अभाव
- ताणतणाव आणि अपुरी झोप
- धूम्रपान आणि मद्यपान
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘अँटी-कोलेस्ट्रॉल’ आहार
आहारातील बदल हा कोलेस्ट्रॉल नियंत्रणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
- मांस, लोणी, चीज आणि फुल-फॅट डेअरी पदार्थ टाळा
- सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण एकूण कॅलरीजच्या 7% पेक्षा कमी ठेवा
- फायबरयुक्त पदार्थ खा:
- ओट्स, कडधान्ये, बीन्स
- भेंडी, वांगी
- सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पेरू
- ओमेगा-3 साठी अक्रोड, अळशी आणि मासे
- लसूण नियमित आहारात घ्या; त्यातील ‘ॲलिसिन’ रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतो
- साखर आणि प्रक्रिया केलेली तेलं शक्यतो टाळा
खराब कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे केवळ रक्तातील आकडा वाढणं नाही, तर हृदयासाठी येणारा मोठा धोका आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि वेळोवेळी तपासणी केल्यास कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते. लक्षणांची वाट न पाहता आजच काळजी घेणं हेच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी ठरेल.

