आजच्या धावपळीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे सर्वात शेवटी लक्ष देतात. घर, नोकरी आणि कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्यांमध्ये दिवस कसा संपतो, हेच त्यांना कळत नाही. याच धावपळीत महिलांमध्ये थायरॉईडसारखा गंभीर आजार वेगाने वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सौम्य असतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. पण हेच दुर्लक्ष पुढे गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
थायरॉईड म्हणजे काय?
थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी गळ्यात असते. ही ग्रंथी शरीराच्या मेटाबॉलिझमसाठी आवश्यक हार्मोन्स तयार करते. जेव्हा ही ग्रंथी कमी किंवा जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करते, तेव्हा शरीराच्या अनेक कार्यांवर त्याचा थेट परिणाम होतो.
थायरॉईडचे दोन प्रमुख प्रकार आहेत
-
हायपोथायरॉईडिझम – हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात
-
हायपरथायरॉईडिझम – हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात
थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे कोणती?
1) वजनात अचानक बदल
काहींचे वजन वेगाने वाढते, तर काहींचे अचानक कमी होते. Cleveland Clinic च्या अहवालानुसार, वजनातील अचानक बदल हे थायरॉईडचे सर्वात सामान्य लक्षण आहे.
2) सतत थकवा जाणवणे
पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यासारखी भावना होते. हायपोथायरॉईडमध्ये सुस्ती येते, तर हायपरथायरॉईडमध्ये अस्वस्थता आणि झोप न लागणे दिसते.
3) केसगळती आणि त्वचेचे बदल
केस पातळ होणे, जास्त गळणे, त्वचा कोरडी होणे किंवा केसांची गुणवत्ता अचानक बदलणे ही थायरॉईडची महत्त्वाची लक्षणे आहेत.
4) हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल
हायपरथायरॉईडमध्ये हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, घाबरल्यासारखे वाटते. हायपोथायरॉईडमध्ये ठोके मंद होतात.
5) मूड स्विंग्स आणि मानसिक बदल
चिडचिड, चिंता, नैराश्य, फोकस न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे ही लक्षणे अनेकदा तणाव समजून दुर्लक्षित केली जातात.
6) महिलांमध्ये मासिक पाळीचा त्रास
मासिक पाळी अनियमित होणे, जास्त किंवा कमी रक्तस्राव, गर्भधारणेत अडचणी येणे हे थायरॉईड असंतुलनाचे संकेत असू शकतात.
7) मानेजवळ सूज दिसणे
गळ्याजवळ सूज येणे किंवा थायरॉईड ग्रंथी वाढलेली दिसणे ही धोक्याची घंटा ठरू शकते.
8) पचनाच्या तक्रारी
बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगल्यासारखे वाटणे या समस्या थायरॉईडमुळे उद्भवू शकतात.
9) डोळ्यांशी संबंधित लक्षणे
सकाळी डोळ्यांमध्ये लालसरपणा, कोरडेपणा किंवा सूज जाणवणेही काही वेळा थायरॉईडशी संबंधित असते.
वेळीच तपासणी का महत्त्वाची?
थायरॉईड हार्मोन्स शरीराच्या जवळपास सर्वच अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, मानसिक तणाव, वंध्यत्व आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
काय करावे?
-
वरील लक्षणे सतत जाणवत असतील तर थायरॉईडची रक्ततपासणी करून घ्या
-
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार सुरू करा
-
नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील बदलांवर भर द्या
वेळीच ओळख आणि योग्य उपचार घेतल्यास थायरॉईड पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत पाऊल उचलणेच सर्वात महत्त्वाचे आहे.

