(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाचल गावात वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. मुंबईहून पुणे, मलकापूर, अनुस्कुरा आणि पाचल मार्गे मालवण तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी पाचल बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येत भर म्हणजे बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांकडून मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली जात होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः आठवडा बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिकच गंभीर होत होती.
या वाढत्या समस्येची दखल घेत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बुधवारच्या आठवडा बाजारात विशेष मोहीम राबवली. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना समज देत आठवडा बाजारासाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
प्रशासनाच्या या नियोजनबद्ध कारवाईचा सकारात्मक परिणाम बुधवारच्या बाजारात पाहायला मिळाला. बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असूनही वाहतूक कोंडी झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, पाचल तंटामुक्त समिती अध्यक्ष देवेंद्र पवार, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील, ग्रामपंचायत पाचलचे मुख्य लिपिक कल्पेश सुतार, नंदू पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा नेतृत्व समीर खानविलकर, ठेकेदार विहंग खानविलकर आणि पत्रकार तुषार पाचलकर उपस्थित होते.
पाचल बाजारपेठेतील वाहतूक समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने अशाच प्रकारे सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

