(राजापूर / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात राजापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोदवली येथील पहिल्या बस स्टॉप फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा तसेच दोन वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत तिघा आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, अवैध दारू तस्करीच्या साखळीचा तपास आता अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण केसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर २४ मे रोजी मध्यरात्री १.२८ वाजता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) आणि (ई) नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात अमोल लक्ष्मण चिंदकर (वय ३५), अमित धोंडू चिंदरकर (वय ३४) आणि प्रशांत प्रकाश पवार (वय २९, सर्व रा. गावडेवाडी, कलमठ, ता. कणकवली) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कोणतीही वैध परवानगी किंवा परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप आणि एक गोल्डन रंगाची इनोव्हा कार अशी दोन वाहने जप्त केली. या दोन्ही वाहनांची एकत्रित किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. यामध्ये ‘Golden ACE Blue Whisky’च्या ७५० मि.ली.च्या १७७६ सीलबंद बाटल्या, १८० मि.ली.च्या २५९२ बाटल्या, ‘Haywards Fine Whisky’च्या २४० बाटल्या, ‘McDowell’s No.1’च्या १२ काचेच्या बाटल्या तसेच ‘Oaksmith’च्या ४८ बाटल्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत ३ लाख ५० हजार २५६ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
राजापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अवैध दारू नेटवर्कचा तपास आता अधिक खोलवर सुरू करण्यात आला आहे.

