(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मार्गावर 26 फेब्रुवारी पासून बोरीवली गणपतीपुळे जयगड रातराणी एसटी बस सेवा सुरू होणार आहे. अखिल भारतीय मराठी महासंघाचे सभासद पांडुरंग भुवड आणि भगवतीनगर येथील भैरी भगवती मित्र मंडळाचे सदस्य सुशील भुते, बंड्या घवाळी,अजित पावसकर, सुयश चौगुले, दिलीप भुते यांच्या मागणीनुसार आणि विशेष प्रयत्नाने ही बससेवा सुरू होत आहे.
बोरिवली गणपतीपुळे जयगड रातराणी एसटी सेवा खेड, महाड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, गणपतीपुळे, जयगड परिसरातील मुंबई उपनगरात वास्तव्य करीत असणाऱ्या वांद्रे ते विरार परिसरातील प्रवाशांच्या सोयी करता राज्य परिवहन रत्नागिरी विभागातर्फे रातराणी एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. सर्वस्वी एसटी वाहतुकीवरच अवलंबून असणाऱ्या प्रवाशांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन या सुखद आणि सुखरूप प्रवासाचा आनंद घेऊन महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याकरिता सहकार्य द्यावे असे नम्र निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सभासद पांडुरंग भुवड यांनी दिले आहे. सदर गाडी सुरू करण्याकरिता उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. खाडे, परिवहन मंत्री, महाव्यवस्थापक राज्य परिवहन, श्री. बोरसे विभाग नियंत्रक रत्नागिरी विभाग, श्री. सुर्वे विभागीय वाहतक अधिकारी रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सदर गाडी बोरीवली येथून रात्रौ. ८:२० वाजता तर जयगड येथून रात्रौ ७:१९ वाजता सुटणारी असेल. तसेच सदर गाडीचा मार्ग बोरिवली, मालाड, सायन, कुर्ला, पेण, पनवेल, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, निवळी फाटा, जयगड, भगवतीनगर, गणपतीपुळे मार्गे जयगड परतीच्या प्रवासाकरिता जयगड, गणपतीपुळे, भगवतीनगर, जाकादेवी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाड, पनवेल, चेंबूर, सायन, वांद्रे, मालाड मार्गे बोरीवलीला जाईल.
सध्या सदर गाडीचे आरक्षण संगणकावर सुरू असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. खास शिमगा उत्सवासाठी ही एसटी गाडी सुरू करण्यात आली असून सदर गाडीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी रत्नागिरी एसटी विभागाकडे संपर्क साधावा असे अखिल भारतीय मराठी महासंघाचे सभासद पांडुरंग भुवड आणि श्री भैरी भगवती मित्र मंडळाचे सदस्य यांचे वतीने करण्यात आले आहे.

