(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर–येरडव मार्गावरील एसटी गाडीच्या फेऱ्या गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर नियमित धावणारी एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पावणे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत बसस्थानकावर एसटीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात राजापूर डेपो व्यवस्थापकांना वारंवार कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप पालक आणि नागरिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने ही बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या बाबत स्थानिक आमदारांनीही सूचना दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आगार प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून राजापूर डेपो व्यवस्थापकांची बदली करावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

