(देवरूख / सुरेश सप्रे)
बाळासाहेबांना अपेक्षित असलेले ८०% समाजकारण व २०% राजकारण ही विचारधारा जोपासत देवरूख शहरातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहून पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत शहरात सर्वांना बरोबर घेत काम करत शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नुतन शहर प्रमुख व उप नगराध्यक्ष वैभव पवार यांनी केले आहे.
देवरूखचे उपनगराध्यक्ष वैभव पवार यांची देवरूख शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांनी पवार यांना प्रदान केलेवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शहरात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझ्यावर दिलेली जबाबदारी पुढे नेताना पालकमंत्री उदय सामंत, युवानेते रोहन बने, जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम संघटनेच्या माध्यमातून करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन व पालकमंत्र्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करीन, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
मी गेली २० वर्षे समाजकारण करत असताना दहा वर्ष ग्रापसदस्य, नंतर नगरसेवक म्हणून काम केले असल्याने जनतेने मला परत नगरसेवक म्हणून निवडून दिले. आणि यामुळेच वरिष्ठांनी मला आता उपनगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे. आता शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. या दोन्ही पदांचा उपयोग जन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करून संघटना वाढीसाठी मी कटीबध्द असल्याचा विश्वास वैभव पवार यांनी व्यक्त केला.

