(चेन्नई)
सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांवर चेन्नईत दुर्दैवी प्रसंग ओढावला. शहरातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या 26 तरुणांच्या गटातील तिघेजण गोल्डन बीच येथे समुद्रात वाहून गेले. यापैकी भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांचा मृतदेह सापडला असून जय पाटील यांचा शोध अद्याप सुरू आहे. तर राज केदारी यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.
सेल्फी घेताना उसळलेल्या लाटांनी ओढले समुद्रात
मिळालेल्या माहितीनुसार, 21 तारखेला सुटी असल्याने हा गट समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता. काही जण सेल्फी घेण्यासाठी पाण्यात उतरले असताना अचानक 10 ते 15 फूट उंच लाट उसळली आणि तिघांना समुद्रात ओढून नेले. पाणी कमरेपर्यंत असतानाच हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री फडणवीसांची तातडीची दखल
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. समुद्रात शोध व बचाव कार्य सुरू असून, महाराष्ट्र सरकारही सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
मयुरी चौधरी: उज्ज्वल भवितव्याचा दुर्दैवी अंत
भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी चौधरी ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. तिने शालेय शिक्षण वरठी येथील सनफ्लॅग शाळेत पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नुकतीच तिला चेन्नईतील कॉग्निझंट मध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली होती. तिच्या वडिलांचा बँक सेवा केंद्राचा व्यवसाय आहे, आई गृहिणी असून भाऊ अभियंता आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शोधमोहीम सुरू, नातेवाईक चेन्नईत
जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नईत पोहोचले असून, मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून रवाना झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे.
मदतकार्य वाढवण्याची विनंती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दु:खद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवावे अशी विनंती केली आहे. राज्य प्रशासन पीडित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून सर्वतोपरी मदत देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पर्यटकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

