(नवी दिल्ली)
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा तब्बल 25 टक्के आहे. ही अभिमानाची बाब असली, तरी याचवेळी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दुधातील भेसळ या गंभीर समस्येतही भारत आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तपासलेल्या दुधाच्या 38 टक्के नमुन्यांत भेसळ
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या 2025 मधील तपासणीत देशभरातील 38 टक्के दूध नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले. म्हणजेच तपासलेल्या प्रत्येक तीन नमुन्यांपैकी एक नमुना भेसळयुक्त किंवा अमानक असल्याचं निष्पन्न झालं आहे.
एफएसएसएआयच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2015 ते 2018 दरम्यान भेसळयुक्त दुधाच्या नमुन्यांमध्ये 16.64 टक्क्यांनी वाढ झाली. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये तपासलेल्या 798 नमुन्यांपैकी जवळपास निम्मे नमुने भेसळयुक्त आढळले. हा 2015 नंतरचा सर्वाधिक भेसळीचा दर आहे.
पॅकेज्ड दुधातही जीवाणूंचा धोका
दरम्यान, ‘ट्रस्टिफाइड’ या स्वतंत्र चाचणी प्लॅटफॉर्मच्या अलीकडील अहवालानेही चिंता वाढवली आहे. या अहवालानुसार, देशातील काही प्रतिष्ठित ब्रँडच्या पॅकेज्ड दुधात कोलिफॉर्म नावाचे हानिकारक जीवाणू निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल 98 पट अधिक आढळले आहेत. त्यामुळे पॅकेज्ड अन्न सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दूध उत्पादनात विक्रमी वाढ
सरकारी आकडेवारीनुसार, 2025 मध्ये भारतातील दूध उत्पादन 24.8 कोटी टनांवर पोहोचले असून गेल्या 11 वर्षांत यात 69.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात दरडोई दुधाची उपलब्धता दररोज 485 ग्रॅम इतकी असून ही जागतिक सरासरी 328 ग्रॅम पेक्षा खूप अधिक आहे. भारत दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे आणि जागतिक उत्पादनात त्याचे योगदान 25 टक्के आहे.
डॉक्टरांचा सल्ला: दूध घेताना खबरदारी घ्या
- दूध नेहमी विश्वसनीय स्त्रोताकडूनच खरेदी करा
- पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट तपासा
- दूध स्वच्छ भांड्यात नीट उकळा
- उकळल्यानंतर झाकून ठेवा किंवा फ्रिजमध्ये साठवा
- वास किंवा चव बदलल्यास दूध पिऊ नका
- उकळल्याने बहुतेक हानिकारक जीवाणू नष्ट होतात
58 टक्के नमुन्यांत पाण्याची भेसळ
इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, तपासलेल्या 330 दूध नमुन्यांपैकी 70.6 टक्के नमुन्यांत भेसळ आढळली.
- 58.5 टक्के नमुन्यांत पाणी
- 23.9 टक्के नमुन्यांत डिटर्जंट
- 9.1 टक्के नमुन्यांत युरिया
काही नमुन्यांत न्यूट्रलायझर, आरारूटसारख्या पदार्थांचीही भेसळ आढळली.
उत्तर भारतात अमानक दुधाचे प्रमाण जास्त
एफएसएसएआयच्या ताज्या दूध सर्वेक्षणानुसार,
- उत्तर भारत: 47 टक्के अनपाश्चराइज्ड दूध अमानक
- दक्षिण भारत: 18 टक्के
- पश्चिम भारत: 23 टक्के
- पूर्व भारत: 13 टक्के
भारत दुधाच्या उत्पादनात जागतिक महासत्ता असला, तरी भेसळयुक्त दुधामुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. कठोर तपासणी, प्रभावी अंमलबजावणी आणि ग्राहकांची जागरूकता याशिवाय ही समस्या थांबवणं अशक्य आहे.

