(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंडये गावात नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर विश्वासाचा आधार. आणि या आधाराचे नाव आहे सरपंच महेश देसाई आणि माजी सरपंच पूनम देसाई. “राजकारण २० टक्के, समाजकारण ८० टक्के” हा मंत्र मनाशी बाळगून या दाम्पत्याने माणुसकीच्या कामातून गावकऱ्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गावातील आजारपण, आर्थिक अडचण, शिक्षणाची गरज किंवा सामाजिक प्रश्न असोत, जात, पक्ष किंवा विचार न पाहता मदतीचा हात पुढे करणारे हे दाम्पत्य कोंडयेकरांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून “एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये” या भावनेने त्यांनी अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पेरला आहे.
कोरोना काळातही धैर्यशील सेवा
कोरोनाच्या कठीण काळात भीती असताना महेश देसाई आणि पूनम देसाई यांनी धैर्याने पुढाकार घेतला. कोरोना बाधितांना रुग्णालयात पोहोचवणे, त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे, जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हे काम त्यांनी अखंडपणे केले. घरी बारा वर्षांचा मुलगा असतानाही समाजकारणाचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. त्यांच्या या सेवेमुळे गावकऱ्यांच्या मनात आजही कृतज्ञतेची भावना ताजी आहे.
विद्यार्थ्यांना दिलेला शब्द… आणि तोही स्वखर्चाने
कोंडये जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक २ आणि ४ मधील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत उल्लेखनीय यश मिळवले. बालग्रामसभेत या विद्यार्थ्यांचा गौरव करत रत्नागिरीतील ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि साहित्यिक स्थळांची शैक्षणिक सहल घडवून आणण्याचा शब्द महेश देसाई यांनी दिला.
हा शब्द त्यांनी कृतीत उतरवला. अत्याधुनिक बस, अल्पोपहार, चहा-नाश्ता आणि सर्व व्यवस्था त्यांनी स्वतःच्या खर्चाने केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान ठरला.
ज्ञान, इतिहास आणि निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव
सहलीची सुरुवात जयगड बंदर येथे फेरीबोटीच्या अनुभवाने झाली. त्यानंतर JSW Energy च्या जिंदाल ऊर्जा प्रकल्पाला भेट देत विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रगती जवळून पाहिली. कोकणच्या साहित्यवैभवाची ओळख केशवसुत स्मारक येथे झाली. गणपतीपुळे मंदिर येथे श्री गणरायाचे दर्शन घेताना भक्ती आणि आनंद दोन्हीही अनुभवता आले. पुढे श्रीमंत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे अवकाशविश्वाची सफर घडली. भगवती किल्ला आणि शिवसृष्टी येथे इतिहास जिवंत झाला, तर थिबा पॅलेस येथे लेझर शोच्या माध्यमातून कोकणातील थोर व्यक्तिमत्त्वांचा इतिहास उलगडला.
कृतीतून दिसणारे नेतृत्व
सहलीनंतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत ज्ञानाची, आत्मविश्वासाची आणि स्वप्नांची चमक दिसत होती. “आपला जिल्हा किती समृद्ध आहे” ही जाणीव त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. महेश देसाई आणि पूनम देसाई यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की खरे नेतृत्व भाषणात नाही, तर कृतीत असते. दिलेल्या शब्दाला जागणे, समाजकारणाचा ध्यास आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले हे पाऊल कोंडये गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.

