(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर येथे बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी धुलीवंदनाचा सण उत्साहात आणि परंपरेनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले धुळवडीचे फेरे नावडी आणि रामपेठ येथून काढण्यात आले.
नावडी व रामपेठ येथून सुरू झालेले फेरे मुख्य बाजारपेठेतून फिरून परतले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पिपाणीच्या सुरेल तालावर परिसर दुमदुमून गेला होता. हातात निशाण घेतलेली मुले, गुलालाची उधळण आणि वाजंत्री यांच्या तालावर धरलेले फेरे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
या उत्सवात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एकमेकांना गुलाल लावून आनंद साजरा केला. “जाखमातेच्या नावानं चांगभलं” असा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या नादात संपूर्ण बाजारपेठ गुलालमय झाली. पारंपरिक उत्साह, एकोप्याची भावना आणि सांस्कृतिक वैभव यांचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

