(संगमेश्वर / एजाज पटेल)
नेहेमी पावलापावलावर दिसणारे कावळे दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहेत. कर्कश आवाजामुळे त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. मात्र, पितृपंधरवड्याचे दिवस सुरू झाले की या पक्ष्यांचे महत्त्व अचानक वाढते. श्रध्येने प्रत्येक घरात श्राद्ध घातले जातात. मात्र, पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही आठवण येत नाही. परंतु या दिवसांत त्यांची काव काव ऐकण्यासाठी व आपण पूर्वजांच्या नावाने ठेवलेला नैवेद्याचा घास घेण्यासाठी घरोघरी कावळ्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सव संपताच सुरू होणाऱ्या या पंधरवड्यात पूर्वजांच्या स्मरणार्थ नैवेद्य ठेवण्याची जुनी परंपरा आजही शहर आणि गावागावांत आवर्जून पाळली जाते. या काळात पितर हे यमलोकाहून पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे, असे मानले जाते. गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटले आहे. मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या तिथीनुसार त्यांच्या आवडीचे पदार्थ, फळे वा अन्न कावळ्यांच्या नावाने वाढले जातात. कावळ्याने घास घेतल्याशिवाय घरातील कुणी जेवायला बसत नाही, अशी परंपरा आजही अनेक ठिकाणी काटेकोरपणे पाळली जाते. पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात व त्याने पितरांना तृप्ती मिळते, असे मानले जाते.
मात्र गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पितृपंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. अनेकदा तासन्तास साद घालूनही कावळे दर्शन देत नाहीत. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी पितृपंधरवड्यात मात्र सुगीचे दिवस अनुभवतो. अशावेळी घरच्यांना, विशेषतः वयोवृद्धांना, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेचे पालन करता न आल्याने दुःख होते. पितरांच्या घासला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बर्याचदा केवळ साकडे घालून आपला कार्यक्रम आपटावा लागतो. कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने “काकस्पर्श” दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

