(खेड / रत्नागिरी)
तालुक्यातील कशेडी-ओझरवाडी येथे विवाहसोहळ्याच्या गडबडीत एका महिलेच्या सुमारे २ लाख ५८ हजार ७३६ रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सौ. वैशाली विनायक सुर्वे (वय ५२, रा. अंधेरी, मुंबई; मूळ रा. म्हसळा, रायगड) या आपल्या भाचीच्या विवाहानिमित्त कशेडी-ओझरवाडी येथील विजय नारायण दरेकर यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० या दरम्यान विवाहसोहळ्याच्या लगबगीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगेतील अथवा अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार आहे.
लंपास करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट आदींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत २,५८,७३६ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लग्नकार्य आटोपल्यानंतर दागिने आढळून न आल्याने सौ. सुर्वे यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (क) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. विवाहसोहळ्यांदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला असून, पोलिसांकडून संशयितांची चौकशी आणि परिसरातील माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

