( खेड- रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आगामी काळात प्रस्तावित कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना या निवेदनाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा; भुजबळ राज्यसभेवर जाण्याचा गौप्यस्फोट – अमोल कोल्हे
मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात खेड तालुक्यातील काही सहकारी संस्थांमध्ये कर्जवाटप प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारींचा उल्लेख आहे. कर्जमाफीसारख्या महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी संबंधित संस्थांमार्फत करताना सखोल चौकशी न झाल्यास अपात्र लाभार्थ्यांना अनुचित फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांची काटेकोर छाननी करावी, संबंधित कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करावी तसेच तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा व्यापक आढावा घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
कर्जमाफी योजना ही खऱ्या अर्थाने गरजू शेतकरी व सभासदांपर्यंत पोहोचावी, यासाठी पारदर्शक, नियमबद्ध आणि जबाबदारीची प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक असल्याचे मोहिते यांनी नमूद केले. दरम्यान, सहकारी क्षेत्रातील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत असून, शासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे कोकणातील शेतकरी व सभासदांचे लक्ष लागले आहे.

