( पुणे )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडून वेगवेगळी मतं व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, भुजबळ साहेब हे अत्यंत अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांचा राजकीय त्याग आणि संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा चर्चेत असून, ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या परिस्थितीत भुजबळ यांच्यासारखा वरिष्ठ नेता संसदेत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
भुजबळ राज्यसभेवर जाण्याची शक्यता
कोल्हे यांनी यावेळी एक गौप्यस्फोट करत सांगितले की, प्राथमिक चर्चेदरम्यान ‘दादां’कडून भुजबळ साहेब राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे असल्याचं बोललं जात आहे.
विमान अपघात प्रकरणावरही भाष्य
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दाखल याचिकेवरही प्रतिक्रिया दिली. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला जात असल्याने संशय अधिक गडद होत असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणं गरजेचं असून तपास यंत्रणांनी सखोल, पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवारांचे प्रश्न राज्यासाठी महत्त्वाचे
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत कोल्हे म्हणाले की, रोहित पवार हे जनतेच्या मनातील प्रश्न मांडत आहेत. या प्रश्नांची उत्तरं राज्याला हवी आहेत आणि ती मिळणं लोकशाहीसाठी आवश्यक आहे.
या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता असून, विलीनीकरण, राज्यसभा आणि अपघात प्रकरणावरील चौकशी यावर पुढील राजकीय समीकरणं ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

