(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती, संस्कार समिती आणि निवेंडी वरची लुंबिनी बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास कार्यक्रमाचा शानदार सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई गोरेगाव येथील पूज्य भन्ते संघराज यांचे प्रभावी आणि प्रेरणादायी प्रवचन होय.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयु. चंद्रकांत कदम यांनी भूषविले. विचारमंचावर तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समिती अध्यक्ष संजय आयरे, महिला मंडळ अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा रितिका जाधव, सचिव दिया कांबळे, माजी अध्यक्षा तृप्ती कांबळे, शिक्षण समिती अध्यक्ष जयवंत कदम गुरुजी, तसेच कार्यकर्ते गौतम सावंत, सुनील कांबळे, दिनकर कांबळे, नरेश कांबळे (कोतवडे), सुनील कांबळे (हातखंबा), विलास कांबळे, निवेंडी शाखेचे दिनेश कदम, सतिश कदम, गौतम कदम आणि महिला मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भन्ते संघराज यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत व धम्म ध्वजाचे ध्वजारोहण यापासून झाली. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण व सूत्रसंचालन दिनेश कदम यांनी केले. तालुका अध्यक्ष प्रकाश पवार यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या उपक्रमांची माहिती देत, वर्षावास प्रवचन मालिकेच्या उद्देशांवर प्रकाश टाकला.
भन्ते संघराज यांनी आपल्या प्रभावी प्रवचनात भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशील मार्ग, सदाचार, नीतिमत्ता, शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “जीवन हे क्षणभंगुर आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून बुद्धांनी तपश्चर्येद्वारे संबोधी प्राप्त केली आणि जगाला माणुसकीचा धडा दिला.”
ते पुढे म्हणाले, “धम्म फुकट शिकू नका — ध्यान करा आणि दान करा. प्रत्येकाने माणुसकीने जगावे, हेच खरे बुद्धांचे तत्त्वज्ञान आहे.” अशा प्रेरणादायी शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि शेवटी “सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो” अशा मंगलमैत्रीच्या शुभेच्छा दिल्या.

