( रत्नागिरी /प्रतिनिधी )
थिबाराजा कालीन बुद्धविहाराच्या जमीन व अस्तित्वासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी संघर्ष समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी, ता. जि. रत्नागिरी येथे होणार आहे.
थिबाराजा कालीन बुद्धविहाराच्या संदर्भात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याची सद्यस्थिती, त्याअनुषंगाने करावयाच्या पुढील कायदेशीर व संघटनात्मक कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती देणे व त्यावर सामूहिक निर्णय घेणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. तसेच बुद्धविहारासंबंधी सुरू असलेल्या न्यायालयीन कामकाजाची अद्ययावत माहिती देऊन पुढील रणनीतीवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
यासोबतच विबाराजा कालीन बुद्धविहाराच्या संघर्षाचे पुढील नियोजन ठरवणे, तसेच १४ एप्रिल २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. आयत्या वेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या संघर्षाला व्यापक पाठबळ मिळावे आणि पुढील टप्प्यांसाठी ठोस निर्णय व्हावेत, यासाठी सर्व अनुयायी, कार्यकर्ते व आंबेडकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नक्की वाचा: जेष्ठ अनुभव–युवा ऊर्जेचा संगम : भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी तालुक्याची २१ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर

