( चिपळूण )
शहरातील मार्कंडी परिसरात असलेल्या एच. आर. वुमन हॉस्पिटल येथे काऊंटर टेबलच्या ड्रॉवरमधून १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी सुमारे ७.५३ वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर चिपळूण पोलीस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली. चोरीस गेलेली संपूर्ण रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या प्रकरणी इम्रान अख्तर हुसैन अन्सारी (वय ४१, रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमधून तपासाचा धागा
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलच्या काऊंटरवरील ड्रॉवरमधील रोख रक्कम लंपास केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, विकास निकम, हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, पोलीस नाईक रोशन पवार, शिपाई शैलेश वनगे, रुपेश जोगी आदींच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
बस, रेल्वे प्रवासाचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी रिक्षाने पसार झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात तो चिपळूण बसस्थानकातून खेडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. बस वाहकाशी संपर्क साधल्यानंतर आरोपी खेड रेल्वे स्थानकात उतरल्याची माहिती मिळाली. तेथील सीसीटीव्ही तपासात आरोपी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दिवा रेल्वेत बसल्याचे दिसून आले.
दिवा रेल्वे स्थानकातून अटक
त्यानंतर चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी समन्वय साधला. दिवा रेल्वे स्थानक येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण १ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे चिपळूण पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर आणि जलद समन्वयामुळे अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

