(चिपळूण)
येथील सुप्रसिद्ध त्वचारोग व सौंदर्यविकार तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी ही नियुक्ती जाहीर केली. चिपळूणसारख्या शहरातून एका अनुभवी आणि कार्यक्षम डॉक्टरची राज्यस्तरीय पदावर निवड झाल्याने कोकणभरातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. राज्यातील डॉक्टर आणि रुग्णांच्या हितासाठी, तसेच नैसर्गिक किंवा अन्य आपत्तींच्या काळात वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने लवकरच समितीची बैठक घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. यतीन जाधव हे कोकणातील नामांकित ‘स्प्रिंग क्लिनिक’चे संचालक असून ‘अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे ते मुख्य प्रवर्तक आहेत. औद्योगिक स्वास्थ्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून प्रभावी आपत्ती व्यवस्थापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी आयएमए महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्ष व समन्वयक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आयएमए टास्क फोर्सचे कोकण विभाग समन्वयक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. कोकणच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते सध्या अध्यक्ष आहेत. तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, चिपळूण तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. ‘सांज सोबत’, ‘एकता विकास मंच’ आणि ‘आपलं चिपळूण’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
एका बहुआयामी, अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाची राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने चिपळूणच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला गेला आहे.

