(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील वैश्य युवक मंडळ देवळे (मुंबई) मंडळाचे संस्थापक, देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, देवळे या संस्थेचे माजी कार्यवाह, ज्येष्ठ नाट्यकर्मी यशवंत सखाराम दाणी उर्फ बाबा यांचे गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रौ ठीक ०१ वाजता वयाच्या ८४व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी बी. इ.एस. टी. मुंबई येथे नोकरी करून नाट्य स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता. देवळे परिसरात त्यांना नटसम्राट म्हणून ओळखले जायचे त्यांच्या जाण्याने देवळेतील नटसम्राट हरपल्याचे बोलले जात आहे.
देवळे येथील वैश्य युवक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक नाट्य प्रयोग सादर केले. तसेच खडगेश्वर मंदिरातील महाशिवरात्र उत्सवातून यशवंत दाणी यांनी अनेक वेळा नाट्य प्रयोग सादर केले होते. यामध्ये विशेष करून “नटसम्राट” हे नाटक खडगेश्वर मंदिर उत्सवातून सादर करून लोकांची वाहवा मिळवली होती.
एस. एन.कानडे आयडीयल हायस्कूल देवळे येथे त्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष श्री निलेश कोळवणकर, सदस्य श्री यशवंत घागरे, मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. देवळे शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह म्हणून त्यांनी उत्तमरित्या कार्य केले. देवळे गावाच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता दाणी कुटूंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, असे संस्थाचालकाने म्हटले.

