(चिपळूण)
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत वैजी गावात नुकताच एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गावातील कृषीदूतांनी मंदिर परिसरात श्रमदान करत स्वच्छता मोहिम राबवून परिसराचा कायापालट केला. या उपक्रमात गवत कापणे, परिसरातील कचरा गोळा करणे, झाडांना पाणी देणे, रंगरंगोटी आणि साफसफाई आदी कामे करण्यात आली.
या उपक्रमात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य संकेत कदम, तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, आणि RAWE समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकृषी संघ व कृषीदूतांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
स्वतःहून पुढाकार घेतलेल्या या सामाजिक उपक्रमात कृषीदूतांसोबत गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. श्रमदानासाठी सर्व स्वयंसेवक सकाळी लवकर मंदिरात जमले आणि नियोजित कामांना सुरुवात केली. मंदिराच्या सभोवतालची जागा गवतापासून मुक्त करून नीटनेटकी करण्यात आली, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला.
कृषीदूत ही योजना केवळ शेती विषयक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी असली, तरी वैजीतील कृषीदूतांनी सामाजिक बांधिलकी जपत मंदिर स्वच्छतेचा उपक्रम राबवून प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत करत कृषीदूतांच्या कार्याचे कौतुक केले. “गावासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन असे उपक्रम हाती घेतले पाहिजेत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी कृषीदूत प्रसाद पंडित, विनायक सावंत, साहिल जमदाडे, श्रेयस जमदाडे, सत्यजीत नांगरे, ओंकार नांगरे, सुहास पाटील, संग्राम माने, सुशांत पाटील, स्वप्नील तोडकर, संकेत चटके आणि श्रीशैल अवताडे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
या उपक्रमाच्या यशामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांत कृषीदूतांचा सहभाग नियमितपणे घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.