( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुखमधील ‘डी-कॅड’ कॉलेजमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेकानेक वाङ्मय अभ्यासक सोत्साह, सानंद वावरत होते, गप्पाटप्पांच्या माहोल रंगला होता. निमित्त होते ते देवरुख चे सुपुत्र ख्यातनाम संपादक-समीक्षक ‘मौज’ परिवाराचे प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी सांगतापूर्तीचे. त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने ‘कला साहित्य संस्कृती व्यवहार’ या विषयावर अभ्यासकांचा एक दिवसीय परीसंवाद चार सत्रात आयोजित केला होता. या परिसंवादाची संपूर्ण जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील येवले गावच्या ‘अनुष्टुभ् प्रतिष्ठान’ने स्वीकारली होती आणि स्थानिक संयोजन व यजमानपद ‘डी-कॅड’ कॉलेजने पार पाडले.
परिसंवादाचा शुभारंभ ‘क्रेडार’ संस्थेचे संस्थापक दाम्पत्य कै. बाळासाहेब व विमलताई पित्रे यांच्या रुबाबदार पोट्रेट समोरच प्रा. श्री. पु. भागवत आणि रंगतज्ञ प्रा. गजानन भागवत यांच्या तैलचित्राचे अनावरण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अजय पित्रे यांच्या हस्ते झाले. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन केले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. वसंत डहाके, अजय पित्रे, प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, प्रा. प्रवीण बांदेकर व प्राचार्य रणजीत मराठे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागतानंतर अनुष्टुभ् प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात अनुष्टुभ् प्रतिष्ठानचे कार्य व परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटक अजय पित्रे यांनी प्रा. श्री. पु. भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय, त्यांचे साहित्यातील अलौकिक योगदान, कला व साहित्य यांचा सहसंबंध याबाबत सविस्तर विवेचन केले.
बीजभाषक कवी व कादंबरीकार प्रा. वसंत डहाके यांनी ‘कला साहित्य संस्कृती व्यवहार’ या मूलभूत विषयाची मांडणी करताना, आदिमानवाने रेषारेघोट्यांद्वारे आपले मनोगत व्यक्त करण्यात प्रारंभ केला. ती अभिव्यक्तीची प्रारंभीची अवस्था होती आणि पुढील काळात ती चित्रकला म्हणून समृद्ध झाली. त्या विविध काळातील चित्रांचे वाचन झाले पाहिजे असे प्रा. डहाके यांनी आग्रहपूर्व सांगितले. चित्र केवळ पाहण्यासाठी नसते, तर ते वाचता आले पाहिजे. त्यामुळे कलावंतांच्या मानसिक प्रेरणा जाणवतातच शिवाय त्याचा कालखंड, त्या काळातील त्यांची संस्कृती, त्याची सामाजिक स्थितीगती इ.अनेक बाबींचे सूचन होते आणि अधिक सूक्ष्मतेने चित्राचे वाचन वारंवार करीत राहिल्यास ती मानवी संस्कृती उलगडत जाते. चित्र हे जणू माणूस आणि त्याचा काळ याचे पुस्तकच बनते. प्रा. डहाके यांनी विद्यमान काळातील चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या काही चित्रांचा संदर्भ देत आपला मुद्दा विशद केला आणि सूचित केले की अनेक लोककला संगीत नृत्यादिकला या संस्कृतीच्या आद्याविष्कार असतात,असे प्रतिपादन केले.
परिसंवादाचे पहिले सत्र ‘लोकसंस्कृती’ या विषयावर समर्पित होते. या परिसंवादाची सुरुवात चिपळूणचे लोकप्रिय शाहीर आणि लोककला अभ्यासक शाहीद खेरटकर यांनी केली. त्यांनी लोकगाणी व लोकवाद्य यांच्या माध्यमातून परंपरेने चालत आलेल्या श्रद्धामय लोक संस्कृतीचे सतत जनजागरण केले. ग्रामीण लोकसमूह चैतन्यदायी ठेवून, जनसामान्यांच्या मनामनात आस्तिकभाव समृद्ध केला. दुसऱ्या अभ्यासात प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी लोकसंस्कृतीच्या वैविध्याचा सविस्तर उलगडा केला आणि विविध वाद्ये तसेच नैवेद्य रूपाने सादर होणाऱ्या खाद्य जीवनाची ओळख सांगितली. मुकुंद कुळे यांनी ग्रामजीवन व नागर संस्कृती यामधील भेद स्पष्ट करून, टाळ मृदुंगाच्या बरोबरीने इतर अनेक वाद्यांची वैशिष्ट्ये नमूद केली. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान सुविख्यात रंगीकर्मी व प्रायोगिक नाटककार अतुल पेठे यांनी भूषविले. त्यांनी प्रारंभीच्या बीज भाषणातील ‘चित्र वाचन’ या संकल्पनेचा संदर्भ विशद करता करता असे आग्रहपूर्वक सांगितले की, कलावंतांनी जुन्या कथा कीर्तन परंपरेचा केवळ गौरवपर विस्तार न करता वर्तमानकाळातील त्याचा नवा आशय, त्याचे प्रतिभासिक सृजन घडविले पाहिजे.
दुसरे सत्र ‘भाषासंस्कृती’ या विषयावर आधारित होते. या सत्राचा प्रारंभ प्रा. दीपक पवार यांच्या दणकेबाज भाषणाने झाला. त्यांनी विद्यमान मराठी समाजात मराठी भाषेची होत असलेली अवहेलना सखेद शब्दात मांडली आणि त्याला विद्यमान सत्ताधाऱ्यांबरोबरच आजकालच्या पालकांना दोष दिला. मातृभाषेतच खरेखुरे अध्ययन आकलन होते, आपली संस्कृती समजते असे आग्रहपूर्वक सांगितले. दुसरे भाषा अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांनीही शिक्षण व्यवस्थेतील मराठी भाषेच्या अवहेलनेला सरकारलाच जबाबदार धरले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. दिलीप धोंगडे यांनी भूषविले. डॉ. धोंगडे यांनी आधुनिक भाषा विज्ञानाच्या अंगाने बोलताना रंगवाचक संज्ञांचे उदाहरणासह विश्लेषण केले. संस्कृतीच्या अंगाने उणिवा समजतात असे प्रतिपादन करताना, आदरार्थी सर्वनामे फक्त मराठी भाषेतच असल्याचे नमूद केले. संस्कृतीचा महत्त्वाचा उपघटक हा वारकरी संप्रदाय असून, त्यांचे संस्कृती विषयक महत्व विशद केले.
तिसरे सत्र ‘माध्यमसंस्कृती’ या विषयावर गुंफले गेले. यामध्ये पराग वडके यांनी आदिम संस्कृतीमध्ये माध्यमांचा केला जाणारा वापर व माध्यम शृंखला याबाबत विवेचन करताना भारतासह इतर देशातील विविध उदाहरणे दिली. माध्यम संस्कृतीचा झालेला विकास ग्रामसभा, दवंडी पिटविणे, शाहिरी-पोवाडे, टीव्ही आणि आजपर्यंतचे डिजिटल प्लॅटफॉर्म यासंबंधीची व्यवहारिक उदाहरणे देऊन माध्यम हे संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे स्पष्ट केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांनी मनोरंजनाच्या दृकश्राव्य माध्यमावर अधिक भाष्य केले. मनोरंजन माध्यमातील चांगल्या वाईट बाजू, प्रत्येकाला कराव्या लागणाऱ्या तडजोडी याबाबत विवेचन केले. प्रत्येक व्यक्तीचे मन स्वतःच्या ताब्यात असल्यासच माध्यम संस्कृती विकसित होऊ शकते, असे ठाम मत व्यक्त केले. युवराज मोहिते यांनी ‘बंगाल गॅझेट’ हे पहिले लिखित माध्यम असून, त्याचे सर्वार्थाने महत्त्व स्पष्ट केले. संविधानातील १९वे कलम महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून, सजग नागरिकांकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. बहुजन समाजाने माध्यम संस्कृती टिकवण्याचे महत्वपूर्ण काम केले. आजचा मीडिया बहुआयामी असल्याचे विविध उदाहरणासह नमूद केले.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी आधुनिक माध्यमे वेगवान झाली तरी त्यातील विश्वासार्हता गमावल्याचे नमूद केले. आकाशवाणी व दूरदर्शन मागे पडल्याने झालेले बदल, मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन साहित्य व मनोरंजन कार्यक्रमाबाबत समाजामध्ये असणारी अनास्था विशद केली. कृत्रिम प्रज्ञेमुळे येऊ घातलेल्या बदलांची उदाहरणे दिली.
शेवटचे म्हणजे चौथे सत्र ‘वाङमयीनसंस्कृती’ या विषयावर आधारित होते. या सत्रात निबंध वाचक प्रा. शितल पावसकर-भोसले यांनी साठोत्तरी मराठी वांड्मयाचा परामर्ष घेत समाजव्यवस्थेतील सत्तासंबंधाचे सांस्कृतिक राजकारणात असणारी आपली निरीक्षणे मांडली. साठोत्तरी कालखंडातील विविध साहित्य प्रवाहांनी जात, वर्ण, लिंग व प्रदेश अशा विविध स्तरावरील मराठी साहित्याचा पैस विस्तीर्ण केल्याची वस्तुस्थिती स्पष्ट केली.
प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी वांड्मयीन संस्कृती व नियतकालिके याबाबत भाष्य करताना सांगितले की, वांड्मयीन संस्कृतीचा नियतकालिके हा महत्त्वाचा घटक असून, वांड्मयीन व्यवहारांच्या चलनवलनासाठी आणि अभिसरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. वांड्मयीन नियतकालिकाचा संपादक वांड्मयीन अभिरुची निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. वांड्मयीन संस्कृतीचा अक्ष म्हणून वांड्मयीन नियतकालिके महत्वाची ठरत असल्याचे विशेषत्वाने नमूद केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांनी भूषविले त्यांनी उत्तम वांड्मय निर्मितीसाठी प्रकाशन गृहांचे असणारे महत्त्व, संपादकांचे कार्य व महत्त्व विशद केले. मराठी साहित्याच्या जडणघडणीमध्ये लेखकांसह, प्रकाशन गृह व संपादक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. वाचन संस्कृतीमधील ग्रंथपालांची भूमिका सर्वार्थाने कशाप्रकारे महत्त्वाची असते, याबाबत सविस्तर विवेचन केले. मौज प्रकाशनच्या माध्यमातून श्री. पु. भागवत यांनी आधुनिक मराठी वांड्मयाची जी समृद्ध परंपरा नमूद केली तिचा आपल्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांनी गौरव केला.
परिसंवादाचा समारोप डॉ. सुरेश जोशी यांनी करताना, प्रा श्री. पु. भागवत यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. मूळ देवरूखच्या असलेल्या प्रा. श्री. पु. भागवत यांची या भूमीतील वांड्मय प्रेमींना सविस्तर ओळख व्हायला हवी, असे आग्रहपूर्वक सांगितले. तसेच या कार्यक्रमामुळे ‘डि-कॅड’ कॉलेज आणि ‘अनुष्टुभ् प्रतिष्ठान’ यांनी संपन्न केलेल्या परिसंवाद वांड्मयीन इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल असे सांगून, त्यांचे आभार मानले.
परिसंवादातील विचार मंथन निष्पत्तीचे सारे श्रेय त्या त्या तज्झ अभ्यासकांसोबत, त्यांची निवड करणारे अनुष्टुभ् प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर व ट्रस्टी जयप्रकाश लब्दे, चित्रकार विक्रम परांजपे, यांच्यासह या कार्यक्रमाचे मुख्य प्रणेते प्राचार्य डॉ.सुरेश जोशी यांची श्री. पु. भागवत यांच्या जन्मगावी त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता अशा वांड्मय समृद्ध कार्यक्रमाने व्हावी अशी अंत:प्रेरणा होती, ती फलद्रूप झाली. विद्यमान मराठी वांड्मय क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक दांपत्य प्रा. वसंत आबाजी डहाके व पत्नी प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांच्या तसेच सुविख्यात रंगकर्मी आणि देवरूखचे नातू अतुल पेठे यांच्या सहभागाने परिसंवादास सोन्याचा कळस लाभला आणि अन्य अभ्यासकांची उपस्थिती ही सोन्या-चांदीची निरांजनेच होती!संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने केला. संपूर्ण परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी डि-कॅड कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

