(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तसेच प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा मानवाधिकार संरक्षण संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा रत्नागिरी जिल्हा पोलीस तपास प्रतिनिधी सुलतान हाफसानी (रा. सोनगिरी, संगमेश्वर) यांनी संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था, प्राथमिक शाळांची सद्यस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळांच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
सुलतान हाफसानी हे संगमेश्वर परिसरातील सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांबाबत सातत्याने पुढाकार घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. शिक्षणासारख्या मूलभूत विषयावर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी प्राथमिक शिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना सुलतान हाफसानी म्हणाले, “प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि संपूर्ण शिक्षणाचा मुख्य पाया आहे. बालवयात प्राथमिक शाळेत मिळणारे संस्कार, भाषिक ज्ञान आणि मूलभूत गणितीय संकल्पनांवरच विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य व पुढील उच्च शिक्षण अवलंबून असते. पायाच कच्चा राहिला तर संपूर्ण शैक्षणिक इमारत कमकुवत होते. म्हणूनच गावागावांतील प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि घटती पटसंख्या रोखणे ही काळाची गरज आहे.”
हा पाया मजबूत करण्यासाठी केवळ शिक्षण विभाग किंवा शिक्षकांवर अवलंबून न राहता शिक्षक, पालक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सातत्याने समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचेही हाफसानी यांनी सांगितले. संपूर्ण समाज गावातील शाळेच्या पाठीशी उभा राहिल्यास प्राथमिक शाळांचे अस्तित्व, गुणवत्ता आणि वैभव टिकून राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण ही प्रत्येक नागरिकाची महत्त्वाची आणि प्राथमिक मूलभूत गरज असल्याच्या मुद्द्यावर गटशिक्षणाधिकारी विजय परीट आणि सुलतान हाफसानी यांच्यात सखोल विचारविनिमय झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच आवश्यक सोयी-सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी परीट यांनी तालुक्यातील शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रम तसेच पटसंख्या टिकविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
दरम्यान, सुलतान हाफसानी यांची नुकतीच ‘रत्नागिरी जिल्हा पोलीस तपास प्रतिनिधी’ म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन हाफसानी यांचा सत्कार केला. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी तसेच शासकीय वाटचालीस त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


