(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडूरंग दत्ताराम कणेरी (वय ३०, रा. अणसुरे आडीवाडी) यास दारूचे तीव्र व्यसन होते. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्याने अणसुरे आडीवाडी येथील चिरेखाण परिसरात एका कुंभ्याच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद (क्र. ०७/२०२६) करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अवघ्या तिशीतच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाने जीवनयात्रा संपवल्याने अणसुरे परिसरात शोककळा पसरली आहे.

