(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख शहरात मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. चोरपऱ्या ते बसस्थानक या प्रमुख मार्गावर गणेशोत्सवापूर्वी नगरपरिषदेकडून झालेली केवळ थातूरमातूर मलमपट्टी पावसात वाहून गेल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
त्यातच बेशिस्त पार्किंग, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास यामुळे वाहतूक कोंडी अधिकच गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी हातगाड्याही रस्त्यावरच लावल्या जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या वर्षी नगर पंचायतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे केली होती. मात्र पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले. त्यावर केलेली तात्पुरती दुरुस्ती देखील पुन्हा वाहून गेल्याने नागरिकांची फसवणूक आणि पैशांचा अपव्यय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आता मात्र या खड्ड्यांवरून राजकीय आखाडाही रंगू लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. पण आपल्या सत्ताकाळात झालेले रस्त्यांचे कामही पारदर्शकतेने झाले होते का? असा प्रतिप्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
दरम्यान, तहसिल कार्यालय–मातृमंदिर रस्ता, चोरपऱ्या–पंचायत समिती–बसस्थानक मार्ग, नगर पंचायत–मशीद मार्ग, तसेच बसस्थानक–भूमी आलेख कार्यालय आदी अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवर वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून, यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

