(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत हद्दीत ३ जून रोजी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीने ग्रामपंचायत पाचलकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सदर व्यक्तींवर आरोप करण्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासन आणि कमिटी याबाबत काय निर्णय घेणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तक्रारदार सौ. वंदना पांडुरंग जाधव यांनी पाचल ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी आपल्या ग्रामपंचायतमध्ये गेली १० वर्षे सफाई कामगार म्हणून काम करीत आहे. सदरचे काम मी इमानेइतबारे करीत आहे. माझे पती श्री. पांडुरंग हेरू जाधव हे त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसविले होते व शेजारच्या हॉल सफाईचे काम करीत होते.
त्यादरम्यान पाचल गावचे ग्रामस्थ श्री. मोहन नारकर हे ग्रामपंचायत कार्यालयात काही कामानिमित्त आले होते. व त्यावेळेला माझ्या पतीची तब्येत ठिक नसल्यामुळे ते खुर्चीत बसले होते. त्यावेळी त्यानी माझ्या पतीला उलट-सुलट प्रश्न विचारून दम द्यायला सुरवात केली. माझे पती त्यांना शांतपणे समजावून सांगत होते. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व त्याचवेळी त्यांनी या पतीच्या कानाखाली मारली व त्यांना धक्काबुक्की केली व जातीवाचक शब्द वापरले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
सदर घटनेबाबत राजापूर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, “योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही वरपर्यंत न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा समाज बांधवांनी प्रशासनाला दिला असल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित कमिटी पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

