(राजापूर)
तालुक्यातील देवीहसोळ येथे सर्पदंशामुळे नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे मयत मुलाचे नाव असून, त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
लिंगवाडीतील विकास भोवड यांचा मुलगा श्रवण याला सर्पदंश झाला, मात्र सुरुवातीला याची कल्पनाच न आल्याने उपचाराला उशीर झाला. प्रकृती गंभीर होताच कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तपासणीत सर्पदंशाची खात्री झाली आणि श्रवणवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
डॉक्टरांनी प्राणपणाने प्रयत्न केले, पण अखेर शुक्रवार, ८ ऑगस्टच्या पहाटे श्रवणची जीवनयात्रा संपली. मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या श्रवणच्या या आकस्मिक निधनाने देवीहसोळ गाव शोकसागरात बुडाले आहे.

