(दापोली / प्रतिनिधी)
दापोली नगरपंचायतीत एकछत्री अंमल राखणाऱ्या शिंदेसेनेने गुरुवारी पार पडलेल्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत चारही समित्यांवर आपली मोहर उमटवली. सर्व निवडी बिनविरोध झाल्याने सत्ताधारी पक्षाची संघटनात्मक पकड अधोरेखित झाली आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या मित्रपक्षांचे प्रत्येकी एक नगरसेवक असतानाही शिंदेसेनेने सर्व पदे स्वतःकडेच राखून ठेवली.
१७ सदस्यीय दापोली नगरपंचायतीत शिंदेसेनेकडे तब्बल १४ जागा आहेत. उद्धव गटातील नगरसेवकांनीही शिंदेसेनेत प्रवेश केल्याने सत्ताधारी पक्षाची संख्याबळ अधिक बळकट झाली आहे. परिणामी, विषय समित्यांच्या निवडणुकीत शिंदेसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मित्रपक्षांनाही प्रतिनिधित्व दिले जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेरीस सर्व पदे शिंदेसेनेकडेच राखली गेल्याने पक्षांतर्गत समन्वयापेक्षा संघटनात्मक एकसंधतेला प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले.
निवडीनुसार, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी खालीद रखांगे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी शिवानी व खानविलकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी रवींद्र क्षीरसागर, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नौशिन गिलगिले यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी अश्विनी लांजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नव्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, शहरप्रमुख प्रसाद रेळेकर आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर यांनी स्वागत करून अभिनंदन केले. या निवडीमुळे नगरपंचायतीतील सत्तेचे केंद्रीकरण अधिक ठळक झाले असून आगामी काळातील विकासनिती व निर्णयप्रक्रियेत शिंदेसेनेची भूमिका निर्णायक राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

