(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकणातील होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची गावी परतण्याची लगबग लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने यंदा दूरदृष्टीने पाऊल उचलले आहे. ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’ अंतर्गत मुंबई महानगर परिसरातून कोकणाकडे एकूण १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत ही विशेष सेवा कार्यरत राहणार आहे.
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अचूक अंदाज घेत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ठाणे विभागातून सर्वाधिक ७९ फेऱ्या नियोजित असून, त्यापैकी तब्बल ७१ फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई विभागातून ६२ फेऱ्या प्रस्तावित असून, ३७ फेऱ्या आरक्षणाने भरल्या आहेत, तर २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या नियोजित असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी राखीव असतील. एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या गट बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा संस्थात्मक स्तरावर प्रवास करणाऱ्यांना सोयीचा पर्याय मिळणार आहे. विशेषतः २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत सर्वाधिक गर्दी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. होळीच्या पूर्वसंध्येला गावी परतण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचत असल्याने या दिवसांकडे एसटी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
या नियोजनामुळे सणासुदीच्या काळात उद्भवणारी संभाव्य गैरसोय मोठ्या प्रमाणात टळणार असून, प्रवाशांना सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासाची हमी मिळणार आहे. खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या मनमानी भाडेवाढीलाही या उपक्रमामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. होळीच्या रंगोत्सवासाठी आपल्या माणसांच्या भेटीसाठी आतुरलेल्या प्रवाशांसाठी ‘लालपरी’ पुन्हा एकदा आश्वासक पंख पसरत सज्ज झाली आहे.

