(मुंबई)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी शिक्षण विभागातील तब्बल 34 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून गैरप्रकार केल्याप्रकरणी एका केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून राज्य शासनाच्या वतीने ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवले जात आहे. मात्र, काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आले. या घटनांची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करत निलंबनाची कारवाई केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बस्मत येथील एका परीक्षा केंद्रावर काही काळासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे त्या वेळी वीजपुरवठा खंडित झालेला नसतानाही कॅमेरे बंद का ठेवले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. चौकशीत केंद्र संचालक दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय बीड, जैतापूर-कन्नड आणि वाशिम जिल्ह्यातील तो जुमडा येथील परीक्षा केंद्रांवर झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणांत दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 109 विद्यार्थ्यांवर गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली.
दरम्यान, ज्या परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले, त्या केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची स्वतंत्र तपासणी करण्यात येणार आहे. नियमानुसार किती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात सामूहिक कॉपी केली आहे, याची खातरजमा करूनच गुणदान केले जाईल, असेही बेडसे यांनी स्पष्ट केले.
शिक्षण मंडळाकडून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि कॉपीमुक्त ठेवण्यासाठी पुढील काळातही अशाच कठोर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

