(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिवजयंतीनिमित्त फळवटप उपक्रमाचे आयोजन करून, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अभिवादन व सेवा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मारुती मंदिर परिसरातील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजांना मनाचा मुजरा अर्पण केला.
राष्ट्राभिमान, स्वराज्य आणि लोककल्याणाच्या विचारांची आठवण करून देत उपस्थितांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी मूल्यांचा जागर केला. यानंतर समितीच्या वतीने शासकीय निरीक्षक गृह येथे बालकांना फळवाटपाचा कार्यक्रम पार पडला. समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद आणि आपुलकीचा स्पर्श पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि हसू हेच या उपक्रमाचे खरे फलित ठरले.
या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार, उपाध्यक्ष प्रकाश पवार, सल्लागार सुनिल आंबूलकर, अजित जाधव, रत्नदीप कांबळे, दिवेन कांबळे, अक्षय संगम कांबळे तसेच प्रसिद्धी प्रमुख केतन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीचा उत्सव केवळ औपचारिक अभिवादनापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा समितीचा हा उपक्रम नागरिकांमधून कौतुकास्पद ठरत आहे.

