(मुंबई)
युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI वापरकर्त्यांसाठी मोठा बदल जाहीर झाला आहे. आता लहान मूल्यांचे व्यवहार करताना पिन टाकण्याची गरज भासणार नाही. चेहरा ओळख (Face ID) किंवा बोटांचे ठसे (Fingerprint) यांच्या आधारे व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. ही सुविधा PhonePe या फिनटेक कंपनीने गुरुवारी अधिकृतपणे सुरू केली आहे.
या नव्या सुविधेमुळे पाच हजार रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे करता येणार आहेत. मात्र, 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी पूर्वीप्रमाणे UPI पिन टाकणे बंधनकारक असेल. मित्रांना किंवा कुटुंबीयांना पैसे पाठवणे, QR कोड स्कॅन करून खरेदी करणे, ऑनलाइन पेमेंट करणे तसेच बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठीही ही सुविधा वापरता येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी पिन टाकताना अनेकदा अडचणी येतात आणि पिनची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत बोटांचे ठसे किंवा चेहरा ओळख प्रणाली अधिक सुरक्षित आणि सोयीची ठरणार असल्याचे PhonePe कडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांचा UPI पिन सुरक्षित ठेवणे आणि डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करणे हा या सुविधेचा मुख्य उद्देश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जर कोणत्याही कारणामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरण स्वीकारले गेले नाही किंवा तांत्रिक अडथळा आला, तर वापरकर्त्यांना तत्काळ UPI पिनचा पर्याय वापरता येणार आहे.
अशी सुरू करा बायोमेट्रिक सुविधा
PhonePe ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर प्रोफाइल सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर ‘Manage Payment’ या पर्यायावर क्लिक करावे. येथे बायोमेट्रिक पेमेंटसाठी दोन पर्याय उपलब्ध असतील – चेहरा ओळख आणि बोटांचे ठसे. संबंधित पर्याय निवडून एकदा स्कॅन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही सुविधा सक्रिय होईल. वापरकर्त्यांनी PhonePe ॲपचे नवीनतम अपडेट इंस्टॉल केले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अपडेटनंतरच हे पर्याय ॲपमध्ये दिसतील.
ही सुविधा सुरू झाल्यामुळे UPI व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि वापरकर्त्यांसाठी सोपे होणार असल्याचे मानले जात आहे.

