(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चर्मालय परिसरातील रस्त्याच्या कडेला सांडपाण्याचे गटार तुंबल्याने परिसरात अस्वच्छतेचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला असून सांडपाणी साचून राहिले आहे. परिणामी, तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक वाहनचालक त्रस्त आहेत.
मिऱ्या–नागपूर कामामुळे विकासाचा गजर होत असतानाच, प्रत्यक्षात मात्र मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘विकासाच्या’ नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या कामाची जबाबदारी असलेल्या रवी इन्फ्रा कंपनीच्या अभियंत्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा दिसून येत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी सांडपाणी तुंबून दुर्गंधी पसरलेली असतानाही तत्काळ उपाययोजना करण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणेकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत का, अशी टीकाही होत आहे. दरम्यान, या कामावर देखरेख ठेवणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाच्या अधिकाऱ्यांचे या सुरू असलेल्या कामाकडे खरोखर लक्ष आहे की नाही, असा रास्त सवाल उपस्थित केला जात आहे.
विकासकामे ही नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी असतात; परंतु नियोजनाअभावी आणि दुर्लक्षामुळे तीच कामे त्रासदायक ठरत असतील, तर संबंधित यंत्रणांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘महामार्ग’ हा शब्द केवळ कागदोपत्रीच राहील आणि प्रत्यक्षात नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्यधोक्यांचा सामना करावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

