(रत्नागिरी)
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखडा आखतानाच सुजाण नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा विचार होणे आवश्यक आहे. कोकणच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ही आवश्यक गोष्ट आहे. याबाबत आयआयएच्या माध्यमातून मंथन कार्यक्रमात आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक आणि सुजाण नागरिकांनी आपापली मते मांडली. हा परिसंवाद आज हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाला. विशेष म्हणजे नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी आर्किटेक्ट व तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि लोकांच्या मागणीनुसार रत्नागिरीचा विकास करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
कोणताही विकास आराखडा शासनाकडे गेल्यानंतर हरकती मागवल्या जातात. परंतु हा आराखडा सुरू झाल्यानंतरच आर्किटेक्ट, नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जावा या दृष्टीने आयआयएने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सिडकोचे माजी मुख्य वास्तुविशारद दिनकर सामंत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे आणि ठामपणे मांडली. सिडकोमार्फत केलेल्या परीपूर्ण आराखड्याचे फलित व नागरिकांचा कसा फायदा झाला आहे, हे सांगितले. त्या दृष्टीने रत्नागिरी, कणकवली, कुडाळ अशा शहरांचाही आराखडा आणि दोन्ही जिल्ह्यांचा आराखडा व्हायला हवा.
ते म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यांच्या विकास आराखडा आखताना तज्ज्ञांची मते विचारात घेतली गेली पाहिजेत. रस्त्यांची अपुरी रुंदी, सार्वजनिक पार्किंगचा अभाव, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी या समस्या लक्षात घ्याव्यात. मोकळी मैदाने, सार्वजनिक सुविधा भूखंड आणि सोयींसाठी आवश्यक जागा अपुऱ्या आहेत.
आयआयएचे सल्लागार आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी समारोपप्रसंगी सांगितले की, तज्ज्ञ, आर्किटेक्ट आणि सुजाण नागरिकांच्या माध्यमातूनच विकास आराखड्यासाठी योगदान दिले पाहिजे. आयआयए आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्यातून एकदा बैठक घेऊन आराखड्यावरील कामाचा पाठपुरावा करण्यात येईल. आराखडा शासकीय चौकटीत बसवून त्याची अमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. कोकणच्या विकासाचा कणा म्हणजे पर्यटन आहे. त्यामुळे त्या माध्यमातून शाश्वत कोकण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधतेने समृद्ध आदर्श गावे विकसित करूया. नगराध्यक्ष शिल्पाताई यासुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने ही नक्कीच विकासाची नांदी ठरेल. शाश्वत विकासाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंतही अहवाल पोहोचवला तर शासनाकडे आपली बाजू मांडता येईल.
आयआयएचे रत्नागिरी सबसेंटरचे अध्यक्ष मकरंद केसरकर आणि सेक्रेटरी श्रेया इंदुलकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला आर्किटेक्ट सदस्यांसह नगरसेवक राजू कीर, नगरसेविका प्रीती सुर्वे, मेधा कुळकर्णी, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, चिपळुणचे शहानवाज शहा, लांज्यातील विवेक सावंत, जयवंत विचारे, राजीव लिमये, आदींसह सुजाण नागरिक उपस्थित होते.
जनतेला अपेक्षित विकास – शिल्पाताई सुर्वे
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या, रत्नागिरी शहर भविष्यात सुसज्ज करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आजच्या या कार्यक्रमाचे नाव मंथन हे खूपच चांगले असून सामाजिक भान असलेले नगरसेवक, नगरसेविका सहकारी आहेत. डीपी प्लॅनचे काम चालू आहे. नागरिकांना अपेक्षित कारभार पारदर्शकपणे करू. विकासकामे सुरू होणार असून त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा.
शिफारशींचा अहवाल आणि पाठपुरावा
ठळक व महत्त्वाच्या इमारती, रेल्वे स्थानके, बसस्थानके, हॉटेल्स, सार्वजनिक इमारती, मंदिरे, आणि पर्यटन क्षेत्रे याबाबत सविस्तर शिफारशींचा अहवाल आर्किटेक्ट्स व सुजाण नागरिकांच्या मदतीने तयार करावेत. हा अहवाल एडीटीपी / नगररचना संचालक, नगरविकास विभागाचे सचिव कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच नगरपालिका आणि पालकमंत्री व आमदार यांच्याकडे सादर करावा. तसेच आयआयएमार्फत परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करा आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करावा, अशी सूचना आर्किटेक्ट दिनकर सामंत यांनी केली.

