(अलिबाग / रायगड)
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी घाट रस्ता ३१ जुलै २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर हा मार्ग अतिसंवेदनशील आणि दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या घाट परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही संभाव्य धोका लक्षात घेऊन ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आंबेनळी घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, पावसाचा जोर कायम असून घाट परिसरात भूस्खलनाचा धोका वाढल्याने बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, मुंबई तसेच पोलादपूर तहसील प्रशासनाच्या अहवालानुसार, आंबेनळी घाटात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वाहतूक बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनीही रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आंबेनळी घाट मार्ग बंद ठेवण्याची शिफारस केली होती.
त्यानुसार जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी करत आज ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रवासी आणि वाहनचालकांनी या कालावधीत आंबेनळी घाट मार्गाचा वापर टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

