(खेड – रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील ऐनवरे (फौजदारवाडी) येथे बेकायदेशीर जमाव करून एका महिलेस काठीने मारहाण केल्याप्रकरणी दहा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी रोहिणी जाधव (रा. ऐनवरे-फौजदारवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुप्रिया सुहास जाधव, राखी राकेश जाधव, सुवर्णा सुभाष जाधव, मंगला संदीप जाधव, वनिता जाधव, अजिता अजित जाधव, सुगंधा तुळशीराम जाधव, सुमन पाडुरंग जाधव, अरूणा मधुकर जाधव (सर्व रा. ऐनवरे-फौजदारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेने ‘वाळीत टाकल्याची’ एक क्लिप व्हायरल केल्याचा संशय आरोपी महिलांना होता. त्यातून निर्माण झालेल्या वादातून त्यांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव केला आणि बांबूच्या काठीने मारहाण करत शिवीगाळ केली, असा आरोप आहे. ही घटना १६ तारखेला दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

