( अमरावती )
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात आज दुपारी एक भीषण अपघात घडला. वरुड–राजुरा बाजार रस्त्यावर राजुरा बाजार परिसरात भरधाव वेगातील शिवाई एसटी बसने प्रवासी ऑटोरिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ऑटोरिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, हा अपघात वरुड पोलीस स्टेशन हद्दीत झाला. एमएच 49/बीझेड 9436 क्रमांकाची शिवाई एसटी बस वरुडहून तळेगाव मार्गे वर्ध्याकडे जात होती. दरम्यान, राजुरा बाजारजवळ बसने ऑटोरिक्षाला मागून धडक दिली. अपघातात ऑटोचे दोन तुकडे झाले आणि घटनास्थळी मृतदेहांचे अवयव विखुरले गेले होते.
शाळकरी विद्यार्थ्यासह पाच जणांचा मृत्यू
मृतांमध्ये सातवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीचा समावेश आहे. मृतांची नावे माही प्रवीण मांगूळकर (13, रा. वाडेगाव), ऑटोचालक कैलास घनश्याम नागदेवे (42, रा. वाडेगाव), हरिभाऊ दौलत शिंदे (83, रा. वघाळ), चिंतामन सदाशिवराव नागदेवे (60, रा. वाडेगाव) अशी आहेत. गंभीर जखमी झालेल्या राजकुमार भलावी (55, रा. गव्हाणकूंड) यांचा नागपूरला नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघातात प्रतिभा लाड (रा. वडाळा) आणि मोहिनी वनदेव भोरे (18, रा. राजुरा बाजार) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ वरुड–राजुरा बाजार रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून बसचालकाला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी वरुड पोलीस पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. हा अपघात बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की ऑटोरिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने, तसेच ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का, याचीही चौकशी केली जात आहे.

