(नवी दिल्ली)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवरून प्रसिद्ध विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार Kapil Sibal यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. निवडणुकांमध्ये विजय-पराभव होत असतो; मात्र संविधान आणि लोकशाहीचा पराभव होता कामा नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, जो जिंकतो तो सिकंदर असतो, हे मान्य; पण विजय कोणत्या पद्धतीने मिळवला गेला, त्यामागे कोणते राजकीय डावपेच किंवा षड्यंत्र होते का, यावरही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर पंतप्रधानांनी केलेल्या ‘आम्ही बदल्याची नव्हे, बदलाची नीती अवलंबतो’ या वक्तव्याचाही सिब्बल यांनी समाचार घेतला. २०१४ पासून केंद्र सरकारने प्रत्यक्षात बदलाची नीती राबवली की बदल्याची, हा खरा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे आरोप केला की, अनेक राज्यांमध्ये बहुमताची सरकारे असतानाही पक्षफोड, आमिषे आणि राजकीय दबावाच्या माध्यमातून सरकारे बदलण्यात आली. “ही बदलाची नीती म्हणायची की बदल्याची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता सिब्बल यांनी संयत भूमिका घेतली. “एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यामागील नेमके विचार काय आहेत, हे समजल्याशिवाय त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे या विषयावर न बोललेलेच बरे,” असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

