(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील कोल्हटकर तिठा ते मोरया चौक या प्रमुख रस्त्याची मुसळधार पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने आणि पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
कोल्हटकर तिठा ते मोरया चौक हा गणपतीपुळेतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून दररोज या रस्त्यावरून शेकडो पर्यटकांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच मार्गावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांनाही जीव धोक्यात घालून खड्डे आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अशीच दुरवस्था होते. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यांतर्गत आपटा तिठा ते मंदिर परिसरातील अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, कोल्हटकर तिठा ते मोरया चौक हा महत्त्वाचा मार्ग अद्याप काँक्रिटीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे किमान तात्पुरती डागडुजी करून वाहतुकीस सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, मालगुंड-वरवडे मार्गावरील आपटा तिठा ते कोल्हटकर तिठा या मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, विशेषतः कोल्हटकर तिठा नाक्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणारी ही समस्या लक्षात घेता गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि संबंधित बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

