(दापोली)
दापोली तालुक्यातील आंजर्लेकडे जाणाऱ्या हर्णे बायपास रस्त्यावर सोमवारी (६ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हर्णे बायपासवरील हॉटेल रेझींटाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आयशर टेम्पो (एमएच-०८-डब्ल्यू-९०१३) आणि सुझुकी अॅक्सेस दुचाकी (एमएच-०८-एव्ही-४७१४) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार बासीद अली दस्तगर बरमारे (वय ३२, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी अडखळच्या पोलीस पाटील अवनी अनंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो चालक गंगाराम रामू माने (रा. नवानगर, ता. दापोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

