(संगमेश्वर / एजाज पटेल)
“आमच्या मुलांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, पण त्याहून अधिक त्यांच्या जीवाची काळजी आहे. केवळ शिक्षणासाठी आम्ही आमच्या मुलांना बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या धोक्यात ढकलू शकत नाही,” अशा संतप्त शब्दांत पिरंदवणे गावातील पालक आणि ग्रामस्थांनी देवरुख एसटी आगार प्रशासनाला इशारा दिला आहे. संगमेश्वर-पिरंदवणे मार्गावरील सायंकाळी ५ वाजताची बस फेरी तातडीने सुरू न झाल्यास मुलांना शाळा व महाविद्यालयात पाठविणे बंद करू, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या मागणीसाठी ग्रामस्थ गणेश आमरे, सतीश जांभळे आणि व्यापारी दशरथ घेवडे यांनी देवरुख एसटी आगारातील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. गावातील विद्यार्थी आणि पालकांवर ओढावलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देत बस सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
एकमेव सुरक्षित बस फेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
पिरंदवणे गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना फुणगूस, संगमेश्वर आणि देवरुख येथे शिक्षणासाठी जावे लागते. शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर सायंकाळी ५ वाजताची एसटी बस ही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवणारी एकमेव सोयीची फेरी होती.
ही बस बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सायंकाळी ६ वाजताच्या बसची प्रतीक्षा करावी लागत असून गावात पोहोचायला रात्री साडेसात ते आठ वाजतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्या आणि गव्यांच्या वावरामुळे पालकांची चिंता वाढली
पिरंदवणे परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यापासून दूर, डोंगराळ आणि जंगलालगत आहेत. बसमधून उतरल्यावर विद्यार्थ्यांना रात्रीच्या अंधारात पायी घरी जावे लागते. या परिसरात बिबट्या आणि गवे यांचा वाढता वावर असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
“मुलं सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागतो. एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाला केला आहे.
१२ ते १३ तास घराबाहेर राहण्याची वेळ
बस फेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता घराबाहेर पडावे लागते आणि रात्री साडेआठ वाजेपर्यंत घरी परतता येते. त्यामुळे कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना तब्बल १२ ते १३ तास घराबाहेर राहावे लागत आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली.
‘बस सुरू झाली नाही तर शिक्षण बंद’
यापूर्वीही अनेक वेळा संगमेश्वर आणि देवरुख एसटी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. देवरुख आगाराने कोणतीही अप्रिय घटना घडण्याची वाट न पाहता सायंकाळी ५ वाजताची बस फेरी तातडीने सुरू करावी. अन्यथा विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठविणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना देवरुख एसटी आगार प्रशासनच जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

