( मुंबई )
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ई-KYC पूर्ण करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून आता 30 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. याबाबत माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. यापूर्वी ई-KYC साठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांमुळे अनेक महिलांना वेळेत ई-KYC करता आले नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मुदतवाढ देत लाभार्थींना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
आधार प्रमाणीकरणाद्वारे e-KYC प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पूर्ण करण्यास शासनाने मान्यता दिली होती. यानंतर पात्र लाभार्थी महिलांना e-KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर आता e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. मात्र, काही अपात्र आणि बोगस लाभार्थी योजनेत समाविष्ट झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये असतानाही काही उच्च उत्पन्न गटातील तसेच सरकारी सेवेत असलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे 1 कोटी 70 लाख महिलांनी ई-KYC पूर्ण केली आहे. तरीही काही महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती भरल्याने त्यांचे 1500 रुपयांचे हप्ते थांबले आहेत. त्यामुळे लाभ सुरू ठेवण्यासाठी अचूक माहिती देऊन ई-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उर्वरित लाभार्थींना दिलासा मिळाला असला, तरी हीच अंतिम संधी मानून महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता आहे.

