(मुंबई)
होळीच्या सणाला गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा प्रवाशांसाठी ऐतिहासिक नियोजन केले आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि तणावमुक्त व्हावा, यासाठी रेल्वेने तब्बल १५०० होळी स्पेशल ट्रेन (Holi Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये फक्त ११४४ विशेष फेऱ्या आयोजित केल्या होत्या. मात्र, यंदा ही संख्या १५०० पर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे वेटिंग लिस्टचा त्रास कमी होऊन प्रवाशांना अधिक कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. विशेषतः कोकण, उत्तर आणि मध्य भारतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता रेल्वेने मार्गानुसार गाड्यांचे नियोजन केले आहे.
झोननुसार होळी स्पेशल ट्रेनची विभागणी:
- पूर्व मध्य रेल्वे (ECR) – २८५ गाड्या
- पश्चिम रेल्वे (WR) – २३१ गाड्या
- मध्य रेल्वे (CR) – २०९ गाड्या (मुंबई-पुणे प्रवाशांसाठी दिलासा)
- दक्षिण मध्य रेल्वे (SCR) – १६० गाड्या
- उत्तर रेल्वे (NR) – १०८ गाड्या
- उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) – ७१ गाड्या
- उत्तर मध्य रेल्वे (NCR) – ६६ गाड्या
- उत्तर पूर्व रेल्वे (NER) – ६२ गाड्या
- पूर्व तट रेल्वे (ECOR) – ६२ गाड्या
- दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) – ४७ गाड्या
- पश्चिम मध्य रेल्वे (WCR) – ४३ गाड्या
- दक्षिण रेल्वे (SR) – ३९ गाड्या
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) – १५ गाड्या
- कोंकण रेल्वे (KR) – ९ गाड्या
- पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (NFR) – २ गाड्या
रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सणाच्या काळात स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक व कर्मचारी तैनात केले जातील, तसेच गाड्या वेळेवर आणि सुरळीत चालवण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे आणि गुजरात परिसरातून लाखो भाविक रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आपल्या मूळ गावी जात असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी कमीतकमी २०० अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवासी समितीने रेल्वेकडे केली आहे. यामुळे प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सच्या महागड्या तिकिटांपासून सुटका मिळेल.
भारतीय रेल्वे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सणासुदीच्या काळात प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल. या नियोजनामुळे देशभरातील लोकांना होळीच्या सणाचा आनंद ताणमुक्तपणे अनुभवता येईल.

