(संगमेश्वर / प्रतिनिधी)
करजुवे खाडी परिसर काही दिवस शांततेत गेला असला, तरी अवैध वाळू उपशाचे चक्र पुन्हा वेगाने फिरू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. शासनाची बंदी आणि पोलिस कारवाईनंतरही रात्रीच्या आड मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असून, परिस्थिती पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काही महिन्यांपूर्वी विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचालकाला बंदूक दाखवत धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्या घटनेनंतर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत काही काळ वाळू उपसा थांबवला. मात्र ‘कारवाईचा धाक’ ओसरताच वाळूने भरलेल्या गाड्या पुन्हा रस्त्यांवर धावू लागल्याचे चित्र आहे. करजुवे खाडीत संक्शन पंपाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. शासनाने उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी घातली असतानाही, भरधाव ट्रक आणि डंपरमधून वाळू जिल्ह्याबाहेरपर्यंत चढ्या दराने पोहोचवली जात असल्याचा आरोप होत आहे. करजुवे–डिंगणी शास्त्रीपूल मार्ग, डिंगणी–फुणगूस पूलमार्गे जाकादेवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून वाळूने भरलेली वाहने विनाअडथळा धावताना दिसत असल्याचे स्थानिक सांगतात.
या प्रकरणात स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून कारवाई न करण्याचा दबाव येत असल्याची दबक्या आवाजातील चर्चा रंगत आहे. शासन आदेशांना धाब्यावर बसवून अवैध व्यवसाय निर्भयपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, यंत्रणेची निष्क्रियता सवालांच्या केंद्रस्थानी आली आहे. करजुवे खाडी परिसरात यापूर्वी वाळू उपशावरून तणाव निर्माण झाला होता. सध्याच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यावरणीय हानी, किनारपट्टीचे क्षरण आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
अवैध उपसा तातडीने थांबवून वाळू वाहतुकीवर कठोर निर्बंध घालावेत, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि प्रशासनाने पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. करजुवे खाडीतील ‘रेती’चा हा प्रश्न केवळ महसुलाचा नसून, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यावरणीय संतुलनाचा आहे. प्रशासनाने वेळीच धडक कारवाई न केल्यास, शांततेच्या पाण्यावर पुन्हा एकदा असंतोषाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

