(देवरूख)
बंजारा समाजाचे परमपूज्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाज सेवा संघ, संगमेश्वर (देवरूख) यांच्या वतीने देवरूख येथे रविवारी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.
जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११ वाजता देवरूख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून डीजेच्या तालावर भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालय असा मिरवणुकीचा मार्ग होता. या मिरवणुकीत बंजारा समाजातील पुरुष, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे बंजारा समाजबांधवांनी परिधान केलेले पारंपरिक पोशाख. रंगीबेरंगी वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साही वातावरणाने भारून गेला होता.
मिरवणुकीनंतर पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी दुपारच्या सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
या जयंती सोहळ्यासाठी संगमेश्वर तालुका बंजारा समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किरण पवार, उपाध्यक्ष अशोक राठोड, माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक, सचिव सागर राठोड, खजिनदार अशोक चव्हाण यांच्यासह शिवाजी राठोड, रवी पवार, अशोक जाधव, तुकाराम पवार, शंकर राठोड, अप्पू शंकर राठोड, मिथून पवार, पुंडलिक राठोड, बाबू राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रद्धा, एकोप्या आणि उत्साहाच्या वातावरणात देवरूख येथे संत सेवालाल महाराज जयंती सोहळा यशस्वीपणे पार पडला.

