(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा वेग वाढण्याची अपेक्षा असताना, अपुऱ्या नियोजनामुळे आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बावनदी पुलानजीक पांगरीमार्गे देवरुखकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या फाट्यावर दिशादर्शक फलकच नसल्याने वाहनचालक संभ्रमावस्थेत सापडत असून येथे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
पांगरीमार्गे देवरुखकडे जाणाऱ्या वाहनांना नेमका मार्ग कोणता, याची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना वाहतूक व्यवस्थापनाच्या प्राथमिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेषतः बाहेरगावाहून येणारे वाहनचालक फाट्यावर गोंधळून जात असून अचानक लेन बदलणे किंवा चुकीच्या दिशेने वळण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्गावरील सुरक्षाविषयक नियमांनुसार महत्त्वाच्या फाट्यांवर दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि इशारा चिन्हे लावणे बंधनकारक असताना बावनदी-पांगरी फाट्यावर या मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपयांची कामे करणाऱ्या यंत्रणेला साधे दिशादर्शक फलक उभारता आले नाहीत का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
या परिसरात वाहतुकीची वर्दळ वाढत असून भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा, तसेच संबंधित ठेकेदाराला तातडीने आवश्यक सूचना देऊन दिशादर्शक फलक उभारण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
अपघात झाल्यानंतर जाग येणार का?
महामार्गावरील सुरक्षेला दुय्यम स्थान देत चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याची टीका होत आहे. दिशादर्शक फलकांचा अभाव, अपुऱ्या सूचना आणि नियोजनशून्य अंमलबजावणी यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असताना प्रशासन आणि ठेकेदार नेमकी कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

