(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अभियानांतर्गत मालगुंड येथील बळीराम परकर हायस्कूल व मुरारी मयेकर ज्युनिअर कॉलेज येथे विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
“सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी आणि सक्षम भविष्य” हे अभियानाचे ब्रीदवाक्य समोर ठेवून जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याने २० जुलै २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणुकीपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत माहिती देत डिजिटल युगातील सावधगिरीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला. तसेच वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अल्पवयीन वाहनचालन टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर विद्यार्थ्यांना संवेदनशील मार्गदर्शन करण्यात आले. स्वसंरक्षणाची प्राथमिक तंत्रे, आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान कसे राखावे, तसेच पोलीस दल, विविध शासकीय सेवा, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासाच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रश्न विचारले. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक बिपिन परकर, ज्येष्ठ शिक्षक उमेश केळकर, प्रा. जयवंत पाटील यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जयगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता, सायबर गुन्ह्यांपासून बचावाची तयारी, वैयक्तिक सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

